
सततच्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर चक्क घरातच पाण्याचे झरे लागलेत. घरातच लागलेल्या या झऱ्यामुळे एका कुटूंबाची मात्र पुरती झोपमोड झाली आहे. रात्रभर हे कुटूंब घरात लागलेल्या झऱ्याच्या पाण्याचा उपसा करीत होते. चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर या गावात हा अजब प्रकार पाहायला मिळत आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. रविवारच्या रात्रीपासून पाऊस सूरू आहे. या पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. चौफेर पाणीच पाणी साचलं असताना आता पावसाने थेट घरातच शिरकाव केला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील चेक दरूर येथिल शांताराम राऊत यांच्या स्वयपाक घरात थेट पाण्याचे झरे लागले आहेत. घर, अंगणात पाणी पाझरू लागल्याने राऊत कुटूंबाची झोप उडविली. साचलेल पाणी रात्रभर उपसण्यात कुटूंबाची झोपमोड झाली.





























































