नगर जिल्ह्यात टँकरची संख्या पावणे आठशेवर; जनतेची ताहन भागवण्यासाठी प्रशासन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरने पाणीपुरवठा करून जनतेची तहान भागविण्यात येत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यावस्त्यांची संख्या वाढत असल्याने पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या वाढत आहे. आता जिल्हाभरात पावणे आठशे टँकरने पिण्याच्या पाण्याचा पाचशे गावे व तीन हजार वाड्यावस्त्यांवरील साडेबारा लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्याचा लोकसंख्येच्या विचार केल्यास सुमारे 25 टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अंवलबून आहे. टँकरची मागणी वाढतच असल्याने टँकरची संख्या वाढवण्यात येणार आहे.

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने फेब्रुवारी महिन्यामध्येच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला होता. एप्रिल व मे महिन्यात अधिक पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर पाणीपुरवठा करणारे टँकरही वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये 535 गावे व 3 हजार 33 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तब्बल 12 लाख 52 हजार लोकसंख्येला रोज 774 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात 504 गावे व 2 हजार 773 गावांतील बावणे बारा लाख लोकसंख्येला 754 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता तीस गावे व तीनशे वाड्यावस्त्यांची भर पडली आहे. त्यासाठी वीस टँकर नव्याने सुरू करण्यात आलेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 2011 मध्ये 45 लाख होती. 2018 पर्यंत ही लोकसंख्या 48 लाखांपर्यंत वाढल्याचा अंदाज धरण्यात आला आहे.

लोकसंख्येचा विचार केल्यास आजघडीला जिल्ह्यातील 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात असून या तालुक्यांमध्ये 106 गावे व 588 वाड्यावस्त्या म्हणजे संपूर्ण तालुकाच टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. या तालुक्यात 146 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर पारनेर तालुक्यातील 75 गावे 503 वाड्यावस्त्यांवरील पावणे दोन लाख लोकसंख्येला 124 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहुरी तालुक्यांमधील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, या तालुक्यांमधून टँकरची मागणी होत आहे. संगमनेरमधील 42 गावे व 250 वाड्यावस्त्या, अकोले तालुक्यातील दोन, कोपरगावमधील तीन, राहुरीमधील 2, नेवासे तालुक्यातील 28 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात केवळ श्रीरामपूर तालुक्यामध्ये टँकरने नाही. कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने काही दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाण्याचे टँकर भरणे सोयीचे झाले आहे.