
सामना प्रतिनिधी । हिंगोली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीच्या अंतर्गत स्थापन झालेल्या न्यासामार्फत हिंगोली तालुक्यातील हिवराबेल या टंचाईग्रस्त गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर दररोज पोहचविले जाणार आहेत. शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात असून हिवराबेलवासीयांची लालपरी तहान भागवणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने टंचाईग्रस्त हिवराबेल हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. रा.प. मंडळाच्या मालवाहतुक सेवेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे टँकर घेऊन रा.प. मंडळाचे अधिकारी हिवराबेल गावात पोहचले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत रा.प. मंडळाचे आभार व्यक्त केले. या टँकरसेवेचे उद्घाटन रा.प. मंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जवंजाळ यांच्या हस्ते हिवराबेल गावामध्ये करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक जे.एन. शिरसाठ, कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे, प्रकाश पडलवार, यंत्र अभियंता एम.आर. नगराळे, सूनील सरोदे, विभागीय वाहतुक अधिकारी सी.सी. दसपुते, हिंगोलीचे आगार व्यवस्थापक पी.बी. चौतमल यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.




























































