ठाण्यात यंदा १४ ठिकाणी हमखास पाणी तुंबणार; नौपाड्याला सर्वाधिक फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे महापालिका हद्दीत तब्बल १४ ठिकाणी हमखास पाणी तुंबणार आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. सर्वाधिक फटका नौपाडा प्रभाग समिती हद्दीतील परिसराला बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान दरवर्षी या भागामध्ये पाणी तुंबत असताना ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने ठाणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ठाणे पालिका क्षेत्रात विविध सखल भागांत पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी मान्सूनच्या काळात प्रशासनाने शहरातील विविध जागांची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी पहिल्या पावसातच विविध ठिकाणी पाणी साचले होते. या ठिकाणी पाणी कसे साचले याचा अभ्यास ठाणे पालिकेने केला. त्यावर उतारा म्हणून पावसाळ्यात या भागात पाण्याचे पंप बसवण्यात आले होते. तर यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४ ठिकाणे पाणी साचणार असल्याचे पत्रक जाहीर केले आहे.

ही आहेत कारणे
बेकायदा बांधकामे वाढल्यामुळे पाणी साचण्याचा धोका आहे. शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सखल भाग निर्माण झाले आहेत. नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलले तर काही ठिकाणी बेकायदा पद्धतीने नाले बुजवण्यात आले आहेत.

येथे पाणी साचणार
नौपाडा – वंदना सोसायटी, गजानन महाराज मंदिर, गडकरी पथ चौक, देवधर हॉस्पिटल, जीजामाता मंडई, चिखल वाडी, चव्हाण चाळ उथळसर वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी, माजिवडा मानपाडा जुना वाघबीळ गाव, वळवी पाडा, कळवा विटावा रेल्वे पुलाखाली
दिवा – दिवा गाव