आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत; वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू, उदयन राजेंचा इशारा

udayanraje-bhosale

‘मी हतबल झालेलो नाही, आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू’, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिला. तसेच समाज आपल्याकडे बघतो आहे. आज जर हे सहन केलं तर उद्या ते अंगवळणी पडेल. फॅशन होईल, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना अत्यंत कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या देशाला, जगाला लोकशाहीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. त्यांनी राजेशाहीच ठेवायची असं ठरवलं असतं तर आज या देशातही राजेशाही असती. मात्र महाराजांनी लोकसहभाग वाढवला, अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. आज त्याचमुळे आपल्याला लोकशाही मिळाली, असंही उदयन राजे यांनी सांगितलं.

‘आज सर्वधर्मसमभावाची व्याख्या बदलली आहे का? महाराजांचा विचार आपण आचरणात आणत नसू तर त्यांचं नाव तरी का घेता?’, असा सवालही त्यांनी केला. आपण व्यक्तीकेंद्री झालो, विशिष्ट समाजाचा विचार केला तर आज या देशाचे किती तुकडे होतील विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे हा देश टिकून आहे, ऐक टिकून आहे. ज्यांनी सर्व समाजांना एक केलं, सर्वांना सन्मान केला त्यांनाच आज अवमान सहन करावा लागतो हे दुर्दैव आहे. असा अपमान करणाऱ्या देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.