आता लढायचं आणि जिंकायचं! उद्धव ठाकरे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

‘धो धो पावसाची पर्वा न करता अथक मेहनत घेतलेल्या शिवसैनिकांमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भगवा फडकला. इरेला पेटला की शिवसैनिक काय करतो त्याची प्रचीती देणारा हा विजय होता. ही पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. यापुढे लढायचं आणि जिंकायचंच! शिवसैनिक असाच एकवटला तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’ असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघात १९ हजार ४०३ मते मिळवून दणदणीत विजयी झालेल्या विलास पोतनीस यांचा आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा विजय मी शिवसैनिकांना विनम्रपणे अर्पण करतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघांत विजय हुकला असला तरी या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला भरघोस मते देणाऱया मतदारांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्या, असे आदेशही त्यांनी विजयी उमेदवारांना दिले.

आमदार झालो तरी शिवसैनिकासारखाच पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढत राहीन आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, असा विश्वास यावेळी विलास पोतनीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार व विभागप्रमुख ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.