
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार की स्वबळावर? या प्रश्नावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नगर जिह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आघाडीतील तिन्ही पक्षांना आपापले पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करतही असतो. यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे असे मला कुठेही दिसत नाही, असे सांगतानाच शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार!
शिवसेनेने विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केलेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले. याबरोबरच वनखातेदेखील रिक्त नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने कामाला चांगली गती आहे, असेही ते पुढे म्हणाले.
फडणवीसांच्या घोषणा साकार होत नाहीत
मध्यावधी निवडणुकांच्या भाजपच्या अंदाजाबाबत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना काही ना काही घोषणा करायची असते, पण त्यांची घोषणा कधी साकार होत नाही. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. दोन वर्षे आघाडी सरकार चालले आहे आणि आणखी तीन वर्षे हे सरकार पूर्ण करेल. इतकेच नाही, तर राज्यात निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी सरकार आले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे सांगत त्यांनी पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सूचित केले.





























































