वेब न्यूज – जीवघेणे हॅकिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हॅकिंग’ हा तसा जगभरातील अनेक प्रमुख देशांच्या सुरक्षा यंत्रणांसाठी कायमच डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे. बँका, इतर वित्तीय संस्था, मोठमोठय़ा पंपन्यांचा खासगी डाटा, औषध कंपन्यांचे फॉर्म्युले, देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील गुप्त माहिती अशा अनेक गोष्टींवरती हॅकर्सची कायमच नजर असते. आजवर हॅकिंगमुळे जगातील सर्वच प्रमुख देशातील वित्तीय संस्थांना आणि सामान्य नागरिकांनादेखील मोठा आर्थिक फटका बसत आलेला आहे. मात्र या वेळी अमेरिकेत एक अत्यंत जीवघेणे असे हॅकिंग उघडकीला आले आहे, ज्याच्यामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सारेच तज्ञ चिंतेत पडलेले आहेत. आजवर आर्थिक, सामाजिक उपद्रवापर्यंत मर्यादित असलेले हे हॅकिंग आता मानवी आयुष्यासाठीदेखील धोकादायक होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याची वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम हॅक करून, पाण्यात केमिकलचे प्रमाण वाढवून एकाच वेळी 15000 लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीला आले आहे. वॉटर ट्रीटमेंट सिस्टीमच्या एका सावध कर्मचाऱ्याच्या वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टाळण्यात वेळीच यश आले. राज्याच्या ओल्डस्मार वॉटर ट्रीटमेंट सिस्टीमला हॅक करून पाण्यातील ‘सोडियम हाईड्रॉक्साइड’ प्रमाण वाढवण्यात या हॅकरला यश मिळाले. पाण्याच्या शुद्धतेसाठी पाण्यात अल्प प्रमाणात ‘सोडियम हाईड्रॉक्साइड’ मिसळले जाते, मात्र याच्या अतिवापराने त्वचा आणि डोळ्यांची आग होणे, केस गळून जाणे असे धोके मानवाला उत्पन्न होतात. हे केमिकल अतिप्रमाणात पोटात गेल्यास पोट, गळा आणि तोंडाला मोठे नुकसान तर होतेच, जोडीला ‘डायरिया’ होण्याचा धोकादेखील निर्माण होतो. ही वॉटर सिस्टीम हॅक करणाऱ्या हॅकरने ‘सोडियम हाईड्रॉक्साइड’चे प्रमाण ‘100 पार्टस प्रति मिलियन’वरून वाढवून ‘11,100 पार्टस प्रति मिलियन’ येवढय़ा मोठय़ा प्रमाणात धोक्याच्या पातळीवरती नेऊन ठेवले होते. यासंदर्भात ‘एफबीआय’ आणि इतर महत्त्वाच्या अमेरिकन सुरक्षा यंत्रणा जोरदार तपासाला लागल्या आहेत. वॉटर ट्रीटमेंट प्लँटच्या बाहेरून हे हॅकिंग करण्यात आल्याचे उघड झाले असले तरी अजूनही कोणा संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही वा अपराध्याचे नाव स्पष्ट झालेले नाही.