वेब न्यूज – फेसबुक आणि गुगल मानवाधिकारांसाठी धोकादायक

996

>>> स्पायडरमॅन

फेसबुक आणि गुगलसारख्या दिग्गज टेक कंपन्या आणि त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे कायमच वादाच्या भोवऱयात अडकत राहिलेले आहेत. युजर्सच्या खासगी माहितीचा या दोन्ही कंपन्यांकडून केला जाणारा व्यावसायिक वापर हा कायमच टीकेचा आणि आरोपांचा विषयदेखील राहिलेला आहे. विविध देशांतील सरकारांनी याबद्दल या कंपन्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे, तर काही देशांत या सोशल प्लॅटफॉर्म्सना वापरायलाच बंदी घालण्यात आलेली आहे. विविध देशांतील प्रतिस्पर्धी कंपन्यांनी गुगल आणि फेसबुकविरुद्ध व्यावसायिक मार्गांचा गैरवापर केल्याबद्दल खटलेदेखील दाखल केलेले आहेत. हे सगळे कमी की काय म्हणून आता ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकारांसाठी जगभरात झटणाऱया प्रसिद्ध संस्थेने गुगल आणि फेसबुक हे मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य केले आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने गुगल आणि फेसबुकच्या बिझिनेस मॉडेल मानवी हक्कांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. ऍम्नेस्टीने या टेक कंपन्यांच्या ‘सर्वंकष देखरेखीबाबत’ चिंता व्यक्त करणारा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 58 पानांच्या आपल्या अहवालात ऍम्नेस्टीने गुगल आणि फेसबुकच्या बिझिनेस मॉडेलचे वर्णन ‘कोटय़वधींवरती जागतिक पाळत’ म्हणून केले आहे. या मानवाधिकार संघटनेने असा दावा केला आहे की, त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म हे मोठय़ा प्रमाणात ‘मानवी हक्कांना हानी पोहोचविणारी परिस्थिती’ तयार करीत आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की, गुगल जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक या सर्च इंजिनचा वापर करतात, तर जगातील एकतृतीयांश लोक दररोज फेसबुक वापरतात असेदेखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाशी फेसबुकने असहमती दर्शवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या वापरकर्त्यांच्या सबलीकरणावर भर देत आहेत. त्याच वेळी उधृत कंपनीने आपण लोकांच्या विश्वासाला महत्त्व देतो आणि वापरकर्त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील आपली असल्याची आपल्याला जाणीव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या