
पापुआ न्यू गिनी हा तसा एक छोटासा, शांत देश आहे. त्याच्याबद्दल आपल्याकडे लोकांना फारशी माहितीदेखील नाही. मात्र सध्या हा देश सर्वच माध्यमांमध्ये प्रचंड चर्चेत आलेला आहे आणि त्याला कारण आहे इथल्या समुद्रकिनाऱयावर वाहून आलेला एक अजब जीव. काही दिवसांपूर्वी इथल्या समुद्रकिनाऱयावर एक सडलेल्या अवस्थेतला, शरीराचा काही भाग गायब असलेला अवाढव्य मृत जीव वाहत आला. तो किनाऱयाला लागताच त्याला बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. हा जीव काही प्रमाणात जलपरीसारखा दिसत असून तो जलपरीच असल्याचा दावा अनेक स्थानिक लोक करीत आहेत. या जिवाची शरीररचना पाहून शास्त्रज्ञदेखील बुचकळय़ात पडले आहेत.
‘न्यू आयरलँडर्स ओन्ली’ नावाच्या फेसबुक पेजवरून या जिवाचे फोटो सर्वात प्रथम प्रकाशित करण्यात आले आणि बघता बघता या जिवाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. अनेक संशोधकांच्या मते आजही खोल जंगलांमध्ये, गुहांमध्ये किंवा खोल समुद्रामध्ये असे काही जीव आहेत ज्यांचे दर्शन मानवाला झालेले नाही. पापुआ न्यू गिनीमध्ये आढळलेला अवाढव्य जीवदेखील असाच पहिल्यांदा पृथ्वीतलावर आलेला आहे. समुद्रातून वाहून आलेल्या अशा जिवांना ग्लोबस्टर म्हणतात. या रहस्यमयी जिवाच्या संदर्भात सध्यातरी फारशी माहिती उपलब्ध नाही. या जिवाचे महत्त्व न समजलेल्या अजाण स्थानिकांनी ना त्या जिवाचे कोणते मोजमाप घेतले, ना कोणत्याही प्रकारे डीएनए नमुने गोळा करण्यात आले. असे काही न करता त्यांनी थेट त्याचे दफन उरकून टाकले.
या रोचक बातमीनंतर सध्या जलपरीच्या अस्तित्वावरदेखील खुमासदार चर्चा रंगू लागली आहे. जलपरी अस्तित्वात असतात आणि आपण त्यांना बघितले असल्याचा दावा करणारे अनेक लोक आपला अनुभव सोशल मीडियावर सांगत आहेत व त्यावर दाव्या-प्रतिदाव्यांच्या फैरी झडत आहेत. अनेक ग्रीक कथांमध्ये उल्लेख असलेल्या या जलपरीच्या अस्तित्वाचा काही पुरावा आता शास्त्रज्ञ मिळवतील का याकडे सध्यातरी सगळय़ांचे लक्ष लागलेले आहे.
























































