‘ममता बॅनर्जी यांना कोरोना झाल्यास मिठी मारेन’, असे बोलणाऱ्या भाजप नेत्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून चर्चेत आलेले भाजप नेते अनुपम हाजरा (Anupam Hazra) यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अनुपम हाजरा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच हाजरा यांनी ममता बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना मिठी मारेन. यामुळे त्यांना कोविड-19 कुटुंबियांचे दुःख समजेल, असे विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांनी गदारोळ करत त्यांच्यावर टीका केली होती.

‘आमचे कार्यकर्ते कोरोना विषाणूपेक्षा मोठ्या शत्रूशी लढत आहे. ते ममता बॅनर्जी यांच्याशी लढत आहेत. ते मास्क न लावता ममता बॅनर्जी यांचा सामना करू शकतात, तर कोरोनाचाही सामना करू शकतात. मला कोरोना झाल्यास मी ममता बॅनर्जी यांची गळाभेट घेईन आणि यामुळे त्यांना कोविड-19 पॉझिटिव्ह कुटुंबियांचे दुःख समजेल’, असे विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

टीएमसी ते भाजप
अनुपम हाजरा तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार असून गेल्याच वर्षी त्यांनी भाजपचा हात हाती घेतला होता. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांवर ज्या प्रकारे अंत्यसंस्कार होत आहेत, त्यामुळे आपण दुःखी असल्याचे हाजरा म्हणाले होते. मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळले जात आहे. कुटुंबियांना अंतिम दर्शनही घेऊ दिले जात नाहीय. असे वर्तन तर आपण कुत्रे किंवा मांजरीच्या मृतदेहांशी देखील करत नाही, असे म्हणत त्यांनी ममता सरकारवर निशाणा साधला होता.