
सामना ऑनलाईन । कोलाकाता
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. 24 उत्तर परगणा येथे शनिवार तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. यामध्ये तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून तसेच पक्षाचे पाच कार्यकर्ते बेपत्ता असल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसनेही आपल्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवण्यात आला आहे. शहा यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
संदेशखाली येथील नजत परिसरात पक्षाच्या झेंडा उतरवण्यावरून हा हिंसाचार सुरू झाला. तसेच गोळीबार आणि बॉम्बही फेकण्यात आले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सायंतन बसू यांनी सांगितले की, संदेशखाली येथे तृणमूल कार्यकर्ते भाजपचे झेंडे उतरवत होते. त्यांना प्रतिबंध केल्यावर त्यांनी गोळीबार केला. गोळीबारात सुकांता मेंडल, प्रदीप मोंडल आणि शंकर मोंडल यांचा मृत्यू झाला.
आरोप-प्रत्यारोप
तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. आमच्या खासदारांचे पथक सोमवारी घटनास्थळाचा दौरा करणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांना रिपोर्ट पाठवण्यात आला आहे.
– मुकुल रॉय, भाजप
तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शनिवारी बूथ पातळीवरील एका बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे 10-12 कार्यकर्ते या बैठकीत शिरले आणि आमचे कार्यकर्ते कयूम अली मोला याच्यावर गोळ्या झाडल्या. चाकूनेही वार केले.
– ज्योतिप्रिया मौलिक, प्रदेशाध्यक्ष, तृणमूल काँग्रेस


























































