
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी हिंसाचाराचा मोठा भडका उडाला. कूचबिहार मतदारसंघात ‘सीआयएसएफ’ या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मतदानावेळी केलेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत एकजण ठार झाला आहे. दरम्यान, या गोळीबाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून, त्यांनीच हा कट रचला होता. शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होत आहे. यापूर्वीच्या तीन टप्प्यांत मतदानावेळीही हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र, आज चौथ्या टप्प्यात मोठा उद्रेक पाहायला मिळाला.
गृहमंत्री शहा यांनीच कट रचला – ममता बॅनर्जी
आज घडलेल्या गोळीबाराच्या घटनेस गृहमंत्री अमित शहा हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनीच हा कट रचला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मी केंद्रीय सुरक्षादलांना दोष देत नाही कारण हे दल गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करतात. गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. भाजपला पश्चिम बंगालमध्ये जनाधार मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मारले जात आहे. पराभव होणार म्हणून जनतेवर सूड घेतला जात आहे. मतदान रांगेत उभ्या असणाऱया मतदारांवर केंद्रीय सुरक्षादलाने गोळीबार का केला? असा खडा सवाल करतानाच मुख्यमंत्री म्हणून आपण या गोळीबाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
तृणमूल जबाबदार – पंतप्रधान मोदी
कूचबिहारमधील गोळीबाराची घटना दुर्दैवी असून, यासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलीगुडी येथील प्रचारसभेत केला. भाजपला जनतेचा पाठिंबा मिळत असल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे लोक गोंधळ घालत आहेत. सुरक्षादलाच्या जवानांना घेराव घातला जात आहे. या घटनेवर निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंतप्रधानांनी केली.
प्रचंड तणाव
कूचबिहार मतदारसंघात सीतलकुची मतदान केंद्र क्रमांक 125 येथे ही गोळीबाराची घटना घडली.
या मतदान केंद्रावर सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्सचे (सीआयएसएफ) जवान तैनात होते. मतदानावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमचक्री उडाली. जमावाने दगडफेक केली. जवानांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणात जवानांनी गोळीबार केला. त्यात चार मतदारांचा मृत्यू झाल्याचे ‘सीआयएसएफ’ने म्हटले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर कूचबिहारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
दुसऱया एका घटनेत सीतलकुची भागातच मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन या तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या गोळीबाराच्या घटनेनंतर या केंद्रावरील मतदान स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. येथे फेर मतदान होणार आहे.



























































