
जिवंत अजगराला खांद्यावर घेऊन सेल्फी काढणं पश्चिम बंगालमधील वन अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. जलपैगुरी येथील बैकुंठापूर जंगलातील अजगराला यशस्वीरित्या पकडल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी उभ्या असलेल्या वन अधिकाऱ्याच्या गळ्याला अजगराने विळखा घातला. सुदैवाने तेथील इतर अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला.
संजय दत्त असं त्या वन अधिकाऱ्याचं नाव आहे. संजयने तेथील गावकऱ्यांसोबत अजगराला खांद्यावर घेऊन सेल्फी काढण्याच धाडस केले. अजगरासोबत फोटो काढण्यासाठी तेथील नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. अजगराला पकडल्यानंतर सुरुवातीला तो शांत होता परंतु जेव्हा त्याने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी हालचाल करायला सुरुवात केली आणि त्या वन अधिकाऱ्याच्या गळ्याला विळखा घातला.
विळखा घातल्यानंतर तिथे अचानक गोंधळ आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. तिथे उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी तो घट्ट व्हायच्या आत संजयची मान सोडवली. जर इतर अधिकारी तिथे नसते तर निश्चितच संजयच्या प्राणांशी गाठ पडली असती.




























































