पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त;जिल्हाधिकाऱयांची प्रशासक म्हणून नियुक्ती,भाजपला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा या मंदिरांसह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गातील सुमोर तीन हजारांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. ही समितीच आता बरखास्त झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. समितीचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, शिर्डी, पंढरपूर व सिद्धिविनायक या सर्वच देवस्थान समित्यांपैकी सिद्धिविनायक वगळता सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व होते. या समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे.

3042 मंदिरांचा समावेश

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत जिह्यातील 3042 मंदिरांचा समावेश आहे. तीस हजारांवर एकर जमीन या समितीच्या ताब्यात आहे. भाजपच्या काळात 2017 मध्ये तत्कालिन जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही मिळाला. या समितीत वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई यांचा यामध्ये समावेश होता. आता ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.