सोमवारपासून पश्चिम रेल्वेच्या 500 लोकल फेऱया

उपनगरीय लोकलमधून सध्या सरकारी आणि खाजगी अत्यावश्यक सेवा घटकांनाच प्रवेश असला तरी काढती गर्दी पाहून पश्चिम रेल्वेने सोमवारपासून दररोज पाचशे लोकल फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी पश्चिम रेल्वे दररोज 350 फेऱया चालवित होती. आता दीडशे फेऱया वाढविण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सध्या उपनगरीय लोकल सेवा अत्यावश्यक घटकांसाठी चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने आणखीन 150 फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या एकूण फेऱयांची संख्या आता 500 होणार आहे. सकाळच्या गर्दीत 30 फेऱया तर सायंकाळी 29 फेऱया असणार आहेत. दररोजची प्रवासी संख्या 1 लाख 25 हजारावरून 2 लाख 25 हजार झाल्याने हा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

23 मार्च रोजी कोरोना लॉकडाऊनने रेल्के सेवा ठप्प करण्यात आल्यानंतर 15 जूनपासून मर्यादित प्रमाणात लोकल सेवेला सुरूवात करण्यात आली होती. त्यावेळी मध्य रेल्वेने दररोज 200 तर पश्चिम रेल्वेने 162 फेऱयांनी सुरूवात केली होती. 1 जुलै पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रत्येकी 350 फेऱया चालविण्यास सुरूवात केली. दर 15 ते 20 मिनिटांनी या लोकल चालविण्यात येत असल्याने पिक अवरमध्ये प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अडचण निर्माण झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या