टीम इंडियाला मेण्टॉरची गरज का? धोनीच्या निवडीवर अजय जाडेजाने व्यक्त केली शंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयच्या सीनियर राष्ट्रीय निवड समितीकडून गेल्या बुधवारी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी या संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये लक्षणीय निवड दिसून आली. यावेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मेण्टॉरपदी निवड करण्यात आली होती. महेंद्रसिंग धोनीच्या या निवडीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या निवडीवर शंका उपस्थित करताना म्हटले की, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr व कर्णधार विराट कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा संघ चांगली कामगिरी करतोय. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघाला मेण्टॉरची गरज आहे असे मला वाटत नाही. एका रात्रीत अचानक असे काय घडले की, बीसीसीआयला प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी मेण्टॉरची नियुक्ती करावी असे वाटले, असेही अजय जाडेजा स्पष्टपणे म्हणाला.

समजण्यापलीकडे

अजय जाडेजा पुढे म्हणाला, महेंद्रसिंग धोनीची मेण्टॉरपदी निवड का केली असावी, याचा विचार मी दोन दिवस करतोय. महेंद्रसिंग धोनीच्या कर्तृत्वाबाबत शंका नाही. तो संघासाठी किती लाभदायक ठरू शकतो हेही माहीत आहे. पण याआधी संघाला मेण्टॉर लाभला नाही. अचानकपणे ही निवड का केली असावी, असे वाटणे साहजिकच आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आधी रवींद्र जाडेजाला फलंदाजीला का पाठवले, हा प्रश्न सतावतो अगदी त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची निवड समजण्यापलीकडे आहे, असेही अजय जाडेजा पुढे स्पष्ट करतो.

विराटच्या नेतृत्वात आयसीसी ट्रॉफीची कमतरता

विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानने तिन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केलीय. पण त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानला चॅम्पियन्स ट्रॉफी, वन डे वर्ल्ड कप व आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची करामत करून दाखवलीय. यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा घेता यावा यासाठी महेंद्रसिंग धोनीची मेण्टॉरपदी निवड केली असावी अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे.