
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी लोकसभेत आज ऊठसूट देशभक्तीच्या बाता मारणाऱया भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीचे वाभाडे काढले. जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने युती तोडल्यानंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले. त्यानंतर एका देशद्रोह्याला मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी भाजपने नेटाचे प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सहा महिने चाललेल्या त्या आटय़ापिटय़ामागे कोणाचे कटकारस्थान होते, असा सवाल फारुख अब्दुल्ला यांनी विचारला.
जम्मू-कश्मीरमध्ये अचानकपणे राष्ट्रपती राजवट लागू केल्याबद्दल राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीही भूमिका संशयाच्या भोवऱयात सापडली होती. या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीवर सभागृहात चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत सहभागी होताना फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. वैचारिक विचारसरणी जुळत नसतानाही पहिल्यांदा भाजपने सत्ता स्थापन करून काही काळ सत्ता उपभोगली. त्यानंतर सरकार गडगडल्यावर इतर पक्षांत काही फाटाफूट करता येते का हेही पाहिले. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती भयावह असतानाही भाजप सत्तेसाठी काय पण अशा तत्त्वाने वागली. काँगेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्याच्या जोरावर ‘पीडीपी’ पुन्हा सत्तेत येईल अशी भीती वाटल्यानेच अचानकपणे तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली गेली असे सांगून ते म्हणाले की, कश्मीर खोऱयातील परिस्थिती अतिशय संवेदनशील असताना भाजपने सत्तेसाठी तेथील परिस्थिती अधिकच बिकट केली. इतकेच नाही तर देशाच्या एका गद्दाराला भाजपने तिथे मुख्यमंत्री करण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र लोकसभेत मी त्या गृहस्थाचे नाव घेऊ इच्छित नाही.
शिवसेनेची मागणी 370 कलम रद्द करा!
जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती बिकट आहे. जम्मू-कश्मीरमधील परिस्थतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळात विषाचे फूत्कार टाकत असलेल्या सापाला आपण दूध पाजत आहोत अशा आशयाचे व्यंगचित्र काढत. आजही ते तितकेच चपखल आहे. आपल्या जवानांवर तिथले तरुण दगड फेकतात हे भयावह आहे. जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिलेले 370 वे कलम रद्द करणे हाच यावरचा उपाय आहे. तो सरकारने तातडीने करावा अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. जम्मू-कश्मीरला मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज मूळ प्रश्न सुटणार नाहीत. कश्मिरी पंडितांना हुसकावून लावले गेले. काँगेसच्या काळातही त्यांची दुरवस्था होती. हे सरकार पंडितांसाठी काही करेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली, अशी भूमिका त्यांनी मांडली.




























































