
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर जिल्हा दौऱयावर येत आहेत. त्यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी प्रशासनातील व्यक्तींना टार्गेट देणे किंवा संस्थेच्या माध्यमातून गर्दी गोळा करणे हे योग्य नसून, देशाचे पंतप्रधान येताना गर्दी ही होतच असते; मग गर्दी जमवण्यासाठी सक्तीची काय गरज वाटते? असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकार दीड वर्षात एकही बैठक घेत नाही म्हणजे सरकारला याचे किती गांभीर्य आहे, हे यातून दिसते, असेही ते म्हणाले.
नगर येथे शासकीय विश्रामगृह येथे आमदार थोरात बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफरे, उत्कर्षा रुपवते, संजय झिंजे, मनोज गुंदेचा आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, पंतप्रधान मोदी हे निळवंडे धरणाच्या कार्यक्रमाला येत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. दुसरीकडे ज्यावेळी पाण्याची गरज होती, तेव्हा पाणी दिले नाही. दहा टीएमसी पाणी असताना, तुम्ही दीड वर्ष पाणी देत नाही, शिर्डी या ठिकाणी दर्शनमंडप तयार होऊन दीड वर्ष झाले आहे, तरीही तिचे उद्घाटन करत नाही. दीड वर्षे त्याचा वापर होत नाही म्हणजे तुम्ही जनतेला वेठीस धरल्याचा हा प्रकार आहे. तसेच राष्ट्रीय संपत्ती वाया घातली, असा आरोप थोरात यांनी केला. कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असू द्या, ते जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला येतात त्यावेळी गर्दी होतच असते. येथे मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी यावे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम ठेवून गर्दी गोळा करण्याचा तसेच सक्ती करण्याचा जो वापर सुरू आहे, तो योग्य नाही, असे सांगत पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी सक्ती का करावी वाटते, असा सवालही थोरात यांनी केला.
सरकार मराठा समाजाची अवहेलना करतेय
मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची जालन्यात झालेल्या सभेतून लोकमानस दिसतो, असे सांगत गेल्या दीड वर्षात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत समितीची एकही बैठक घेतली नाही की संवाद साधला नाही. यावरून हे सरकार मराठा समाजाची अवहेलना करतेय असेच दिसते, असा आरोपही त्यांनी केला. आरक्षणाबाबत दोघांनी आत्महत्या केल्या ही घटना दुर्दैवी आहे. आता सरकारने मराठा आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देऊ नये, असेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
नगर शहरामध्ये पुन्हा गुंडगिरी
समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला ही बाब गंभीर आहे. नगर शहरातील गुंडगिरीसंदर्भात विधानसभेत लक्ष वेधले होते. तरीही शहरातील गुंडगिरी थांबायला तयार नाही. हेरंब कुलकर्णी यांची लवकरच भेट घेऊन माहिती घेणार आहे. शहरातील दृष्टप्रवृत्तीबद्दल आता कडक पावले उचलणे गरजेचे आहे, असेही आमदार थोरात यांनी सांगितले.




























































