पंतप्रधानांच्या तोंडातून ‘चीन’चं नावही निघत नाही, परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलाचे चीनसोबत असणाऱ्या संबंधावरही काँग्रेसचे बोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी संसदेतून पळ काढत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. चीनच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्र्यांऐवजी पंतप्रधान मोदी यांनी बोलायला हवे. मात्र त्यांच्या मुखातून साधे चीनचे नावही निघत नसून यामागे त्यांचे चीन सोबत असणारे घनिष्ठ संबंध कारणीभूत आहे का? असा सवाल काँग्रेसने केला आहे. तसेच विवेकानंद फाउंडेशन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाचे चीनसोबत असणाऱ्या संबंधावरही कॉंग्रेसने बोट ठेवले. यावेळी कॉंग्रेसने ‘चीन पर चुप्पी तोड़ो, भारत जोड़ो’, असा नाराही दिला.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश आणि प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर एकामागोमाग एक सवालांच्या फैरी झाडल्या. 1988 ला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी चीन दौऱ्यावर गेले होते. या यात्रेमुळे सीमारेषा आणि द्विपक्षीय संबंध मजबूत झाले. मात्र एप्रिल 2020नंतर नवीन अध्याय सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या हद्दीत कोणी घुसले नव्हते आणि घुसलेले नाही असे म्हटले होते. या क्लीन चिटमुळे आपली बाजू कमकुवत झाली, असे जयराम रमेश म्हणाले.