संगमेश्वर तालुक्यात रानगव्यांचा धुमाकूळ, रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात सध्या रान गव्यांनी धुमाकूळ घातला असून सह्याद्री पर्वतरांगांमधून तळकोकणात उतरलेल्या या गव्यांनी रब्बी पीके मोठ्या प्रमाणावर फस्त केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गव्यांचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. वनविभागाला मोठ्या संख्येने असणाऱ्या रानगव्यांसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे शक्य नसल्याने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सह्याद्री पर्वतरांगेतील जंगलात वास्तव्याला असणारे रान गवे पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर तळकोकणातील शृंगारपूर, वाशी, दख्खन आदि गावात खाली उतरतात. या गव्यांचे वेगवेगळे कळप असल्याने हे कळप हळूहळू आजूबाजूच्या गावात खाद्य मिळविण्यासाठी आणि पाण्यासाठी रात्रीच्या वेळी जातात. शेतात मोठ्या संख्येने घुसणारे गवे एकाचवेळी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. उन्हाळ्यात जंगल परिसरात पाण्याचे साठे संपूष्टात येत असल्याने गव्यांसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने मानवी वस्तीच्या जवळपास उतरतात. गावाजवळ असणाऱ्या पाणवठ्याजवळ या वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला आढळून येतो.

संगमेश्वर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी आंबवली मराठवाडीत एक रानगवा रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याची घटना घडली होती. वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने या गव्याची सुखरुप सुटका केली असली तरीही वन्यप्राण्यांचा मानवी वस्ती जवळ वावर वाढल्याचा हा पुरावाच होता. गतवर्षी साखरपा नजीकच्या एका गावात मानवी वस्तीजवळच दोन गव्यांचा झुंज लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. गव्यांबरोबरच, बिबटे, सांबर, नीलगायी असे विविध वन्यप्राणी मानवी वस्तीच्या आजूबाजूला वावरतानाचा आढळ दिसत आहे.

गव्यांनी संगमेश्वर तालुक्यातील वाशी, मुचरी, तेऱ्ये, लोवले, शिवने आदी गावात मोठा धुमाकूळ घातला असून कुळीथ, तूर, चवळी, पावटा, मटकी या रब्बी पिकांसह विविध भाजीपाला फस्त करून मोठे नुकसान केले आहे. सध्या कुळीथ आणि पावटा ही दोन रब्बी पिके अगदी काढणी योग्य झाली असतांना गव्यांनी शेतात घुसून ही पिके फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेले चार महिने केलेली मेहनत वाया गेल्याने आता या नुकसानाला तोंड कसे द्यायचे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कुळीथ – पावटा यासारख्या पिकांवर शेतकरी कुटुंबाची बेगमी अवलंबून असते. पावसाळ्यातील या बेगमीच्या पिकांवरच गव्यांनी घाला घातला असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे.

गव्यांसह वानर आणि माकडे यांचा रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान करण्यात मोठा त्रास होत असल्याने शेतकरी शेताभोवती शेडनेटचा बंदोबस्त करुन मोठा खर्च करत असतो. मात्र गव्यांनी शेतात घुसताना शेडनेट फाडून टाकल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. गवे शेतात फिरल्यानंतर बहुतांश पीक त्यांच्या मोठ्या पायाखाली तुडवले जाते. अन्य पिकांचा ते खाऊन फडशा पाडत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पिकातील एक दाणा येताना अवघड झाले आहे. शेतात सलग चार दिवस गवे आल्यानंतर कोणतेही पीक जागेवर उभे दिसत नसल्याचे विदारक दृष्य लोवले, तेऱ्ये, मुचरी, वाशी आदि गावातून पहायला मिळत आहे. गव्यांचा बंदोबस्त करणे वनविभागाला शक्य नसल्याने रानगव्यांकडू रब्बी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान नुकसान भरपाई तरी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.

शेतात राबायचे तरी कशाला ?

माझ्या शेतातील पावटा फुलून चांगलाच तरारला होता. गेल्या चार महिन्यांची मेहनत फळाला आल्याचा आनंद वाटत असतांनाच एका रात्री रानगव्यांनी शेतात घुसून पावटा, चवळी, वाल, भेंडी, वांगी अशा सर्व पिकांचा अक्षरशः फडशा पाडला. दुसऱ्या दिवशी उद्ध्वस्त झालेले शेत माझ्या नजरेला पहावत नव्हते. जर असेच घडणार असेल तर शेतात राबायचे कशाला ? असा आर्त सवाल डोळ्यात पाणी आणून लोवले येथील 65 वर्षांच्या जयवंती फटकरे या शेतकरी महिलेने उपस्थित केला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा म्हणून जयवंती या दरवर्षी रब्बी पिकांसह भाजीपाला लागवड करून विक्री करतात. यावर्षी त्यांच्या शेतात सलग चार दिवस आलेल्या गव्यांनी सर्व शेतच उध्वस्त केले.

मेहनत वाया जातेय याचे दु:ख

आमच्या शेतात आई वडिलांसह, बहिण आणि मी असे चार जणं सतत राबत असतो. सेंद्रिय खतांचा वापर करुन मी कलिंगड आणि भाजीपाला लागवड केली. एक दिवशी रात्री शेडनेट फाडून आमच्या शेतात घुसलेल्या गव्यांनी काकडी आणि वालाचे सर्व पीक उद्ध्वस्त केले. काकडी आणि वाल याला उत्तम लाग सुरु झाला होता. या पिकांना ग्राहकांची देखील मोठी मागणी होती. अशातच गव्यांनी एका रात्रीत केलेल्या नुकसानामुळे घरातील सर्वांची मेहनत वाया जातेय याचे दु:ख होते.
– शुभम दोरकडे (कृषी पदवीधारक युवा शेतकरी )