
सामना प्रतिनिधी । हिंगोली
शहराच्या नाईकनगर भागात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या झिरो वायरमन म्हणून काम करणाऱ्या माधव विठ्ठल चांदणे या व्यक्तीचा विजेच्या खांबावर चढल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान चांदणे हे अनधिकृतपणे वीज खांबावर चढले होते. त्यांचा महावितरणसोबत कोणताही संबंध नाही, असा दावा अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केला आहे.
हिंगोली शहरामध्ये महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराने एका निष्पाप इसमाचा बळी घेतल्याची चर्चा घटनास्थळी होताना दिसून आली आहे. याबाबत हिंगोली शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाईकनगर भागातील विज वाहिनीच्या खांबावर माधव विठ्ठल चांदणे हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चढले होते. त्यावेळी वीज प्रवाह चालू असल्यामुळे चांदणे यांना विजेचा जोरदार शॉक लागून विद्युत खांबावरच त्यांचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर नाईकनगर भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली शहर पोलिसांना माहिती समजल्यावर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. विद्युतप्रवाह खंडित करून चांदणे यांचा मृतदेह खांबावरून उतरवण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वीज महावितरण कंपनीचे हिंगोली येथील अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव हे घटना घडल्यावर तब्बल दीड तास या घटनेपासून अनभिज्ञ होते. त्यानंतर माधव चांदणे यांचा अपघाती मृत्यू झाला असून ते अनाधिकृतपणे विद्युत खांबावर गेल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. तसेच झिरो वायरमन नसल्याचेही जाधव यांनी सांगितले. मयत माधव चांदणे हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील रहिवासी असून झिरो वायरमनचे काम करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात चौकशी झाल्यास वीज महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर येणार आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खाजगी कंत्राटी इसमांना झिरो वायरमन म्हणून कामावर ठेवण्याचे प्रकार सुरू असल्याचे नेहमीच बोलले जाते.
































































