
मंगळवारी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर अक्षरश: हैदोस घातला. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करत दगडफेक आणि तोडफोड केली, यावेळी महाराष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. या घटनेनंतर सीमाभागात तणाव वाढला आहे. यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत केंद्रावर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी एकापाठोपाठ दोन ट्विट केले आहेत. ‘दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही’, असा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय
बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा
कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ!’, असं आवाहान देखील त्यांनी केलं आहे.
पुढल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, ‘मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे’.
दरम्यान, महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा कर्नाटक आणि केंद्राला दिला.































































