
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अनैतिक संबंधांना विरोध केल्याने महिलेने प्रियकराच्या सोबतीने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील अशोक नगर परिसरात हा भयंकर प्रकार घडला असून पोलिसांनी सुभद्रा देवी (51) आणि तिचा प्रियकर अजीत (30) याला अटक केली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी अशोक नगर परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून मृत तरुणाची ओळख पटवली. या तरुणाचं नाव रवींद्र पाठक (30) असं असून तो आई आणि मित्रासह त्याच परिसरात राहतो, असा तपशीलही त्यांना कळला. पोलिसांनी याच अनुषंगाने तपास सुरू केला असता धक्कादायक सत्य समोर आलं. रवींद्रच्या घरात अजीत गेला काही काळ राहत होता. त्याचे आणि रवींद्रची आई सुभद्रा हिचे अनैतिक संबंध होते. या संबंधांतून सुभद्राला तीन महिन्यांपूर्वी मूलही झालं होतं. रवींद्रला सात विवाहित बहिणी आहेत. त्यापैकी एका बहिणीकडे हे मूल सांभाळण्यास देण्यात आलं होतं. रवींद्रचा आई आणि मित्राच्या अनैतिक संबंधांना तीव्र विरोध होता. त्यांचं या कारणावरून वरचेवर भांडण होत असे. रविवारी पुन्हा याच कारणामुळे त्यांच्यात वाद झाला आणि सुभद्राने अजीतच्या साथीने रवींद्रला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर विटांनी प्रहार केला आणि गमछ्याने त्याचा गळा आवळला.
रवींद्र बेशुद्ध झाल्याचं पाहून ते दोघंही घाबरले आणि त्यांनी अँब्युलन्स बोलवली. आपल्या मुलाचा अपघात झाला असून त्याला त्वरित रुग्णालयात न्यावं लागेल, असं सुभद्राने अँब्युलन्स चालकाला सांगितलं. मात्र, चालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना सूचना देण्याविषयी सांगितलं. त्यावर ते दोघंही घाबरले आणि तिथून पसार झाले. सुभद्राने आझादपूर येथील आपल्या मुलीचं घर गाठत तिला रवींद्रचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार करण्यासाठी चल असं विनवलं. तिला घेऊन ते पुन्हा जुन्या घरी आले. दरम्यान, अँब्युलन्स चालकाने पोलिसांना फोन केला होता. त्यामुळे पोलीस आधीच रवींद्रच्या घरात आले होते. त्यामुळे परत आलेली सुभद्रा आणि अजीत त्यांच्या तावडीत आपोआप सापडले. त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
























































