
दारुचे व्यसन असलेल्या प्रेयसीला दारुसाठी तिच्या बॉयफ्रेंडच्या खिशातून पैसे चोरणे फार महागात पडले आहे. त्या बॉयफ्रेंडने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी फेकला. तेलंगणातील सिकंदराबाद येथे हा प्रकार घडला आहे.
भुलक्ष्मी (40) असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची प्रकाशम जिल्ह्यातील रहिवाशी होती. काही महिन्यांपूर्वीच ती सिकंदराबाद येथे राहायला आली होती. त्यावेळी मंगमुरी वेंकट याच्यासोबत तिची ओळख झाली. वेंकट तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले. भुलक्ष्मी व वेंकट दोघांनाही दारु प्यायचे व्यसन असल्याने ते बऱ्याचदा एकत्र प्यायला बसायचे.
गेल्या रविवारी देखील ते दोघे एकत्र दारू प्यायला बसले होते. त्यानंतर वेंकट झोपला मात्र भुलक्ष्मीची दारुची तल्लफ मिटली नव्हती. त्यानंतर तिने वेंकटच्या खिशातले बाराशे रुपये काढले व ती पुन्हा दारू पिऊन आली. वेंटक संध्याकाळी उठला तेव्हा त्याच्या खिशात पैसे नव्हते. ते बघून तो वैतागला. त्याने याबाबत भुलक्ष्मीला विचारले. पण ती शुद्धीत नव्हती. त्यामुळे तो रागाने घराबाहेर गेला. त्यानंतर रात्री जेव्हा तो परतला त्याने पुन्हा भुलक्ष्मीला दारू पाजली. दारूच्या नशेत तर्राट झालेल्या भुलक्ष्मीचा गळा घोटून हत्या केली. त्यानंतर तिचे कपडे फाडून तिच्या शरीरावर चाकून वार केले. तिचा मृतदेह एका बांधकाम बंद पडलेल्या इमारतीत फेकला.



























































