जागतिक महिलादिनी कराडमध्ये हातगाडी चालक महिलांचे ‘भिक मागो’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडमध्ये हॉकर्स झोनसाठी हातागाडीधारक आक्रमक झाले असून जागतिक महिलादिनी महिला विक्रेत्यांनी शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ ‘भिक मांगो’ आंदोलन केले. आंदोलक महिलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी भिक मागीतली. हॉकर्स झोन व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची त्यांना विनंती केली.पृथ्वीराज यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. हातगाडीधारकांनी त्यांना मागण्यांचे निवेदनही दिले.

अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये एसटी स्टँड परिसरासह संपूर्ण कराड शहरातील हातगाडे हटवण्यात आले आहेत. हॉकर्स झोन जाहीर करून नगरपालिकेने हातगाडे चालकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. एसटी स्टँडसमोरील पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा आणि नवग्रह मंदिराच्या परिसरातील एसटी स्टँड भिंतीलगत तात्पुरते हातगाडे चालकांना देण्यात यावी अशी मागणी होत असून याला नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अनुकूल आहेत तर कराड नगरपालिकेचे नगरसेवक इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले.

कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरू झाल्यापासून बारा दिवस व्यवसाय बंद आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असून नगरपालिका हॉकर्स झोनबाबत निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी भिक मागो आंदोलन करून केला, असे हातगाडाधारक संघटनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. हातगाडा धारकांनी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. व्यवसाय बंद आहे, त्यामुळे रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा मांडली. हातगाडे लावत नाही, मात्र झोन करा अशी मागणी केली आहे. जागेचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत हातगाडेधारक आहे त्याठिकाणी हातगाडे परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.