भरदिवसा घरफोडी करणार्‍या महिलांना बेड्या; चोरीचे दागिने घेणारे सराफही जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेकी करून भरदिवसा औंध भागात घरफोडी करणार्‍या दोन महिलांना चतुःश्रृंगी पोलिसांनी बीड व जालना जिल्ह्यातून अटक केली. तर, चोरीचे दागिने विकत घेणार्‍या दोन सराफांना देखील बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सोन्या, चांदीचे दागिन्यांसह तब्बल 43 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आठ दिवस वेशांतर करून पोलीस आरोपींच्या मागावर होते.

खुशबु दिपील गुप्ता उर्फ खुशबू कठाळू काळे (वय.19,रा.सरकारी दवाखान्याजवळ घनसांगवी, जि.जालना), अनु पवन आव्हाड उर्फ अनु राहूल भोसले (रा. पारधी वस्ती, राजापूर फाटा,ता. गेवराई,जि.बीड), तर, सराफ महावीर धनराज चपलोत (वय 35, कोपरी कॉलनी ठाणे (पुर्व), मदन रामेश्वर वैष्णव (वय.26,रा.शिवाजीनगर कळवा ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. घरफोडी करणार्‍या टोळीतील सर्व आरोपी महिला आहेत.

बाणेर रोड औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीतील एका बंगल्यामध्ये ही घटना घडली होती. येथून आरोपींनी 205 तोळे सोन्यांसह 66 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. याबाबत 55 वर्षांच्या व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, व्यावसायिक हे त्यांच्या कुटुंबियांसह जेवणासाठी घराबाहेर गेल्यानंतर ही घरफोडी घडली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास केला असता, घरफोडी महिलांच्या टोळीने केली असून, ते बीड व जालना जिल्ह्यातील रहीवाशी असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक आणि त्यांच्या पथकाने थेट बीड जिल्हा गाठला. तेथे अनु हिची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवस वेशांतर करून माळरानावरील वस्तीवर फिरून तिला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनूसार खुशबू हिला जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथून तिला ताब्यात घेतले. त्यांनी सोने, चांदी विकलेल्या दोघा सराफांना ठाण्यातून अटक करण्यात आली. तर, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपेश चाळके, निलेशकुमार महाडीक, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, तेजेस चोपडे,श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, किशोर दुशिंग यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

घरफोडीच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासावरून आरोपींना बीड आणि जालन्याातून अटक केली आहे. यातील एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून सोने घेणार्‍या ठाण्यातील दोन सराफांना सुद्धा अटक केली आहे.
– बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलीस ठाणे