‘हिंदू देव-देवतांची पूजा करणार नाही’, दिल्लीच्या कॅबिनेट मंत्र्यांची शपथ; विरोधकांची पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) हे बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी हिंदू देव-देवतांची पूजा करणार नसल्याची शपथ घेतली. यावर भाजपने निशाणा साधला असून भाजप प्रवक्ते हरीश खुराणा यांनी दिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी हिंदूंच्या देव-देवतांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. तसेच भाजप नेते कपिल मिश्रा आणि खासदार मनोज तिवारी यांनीही या कार्यक्रमावर सवाल उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे देखील नाराज असल्याचे वृत्त आहे.

राजेंद्र पाल गौतम हे दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री आहेत. बौद्ध महासभेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात राजेंद्र पाल गौतम सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रीराम, श्रीकृष्ण या हिंदू देवतांना मानणार नाही आणि हिंदू देव-देवतांचे पूजन करणार नाही अशी शपथ घेण्यात आली. मंचावर उपस्थित कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनीही ही शपथ घेतली. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

निवडणुका येताच अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा म्हणतात. गुजरातला जातात तेव्हा जय श्रीकृष्णचा जप करतात, परंतु दिल्लीमध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री हिंदू देव-देवतांना मानणार नाही आणि पूजा करणार नाही असे म्हणतात, अशी टीका आदेश गुप्ता यांनी केली आहे. तसेच केजरीवाल यांनी 24 तासात राजेंद्र पाल गौतम यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा. कोणालाही कोणाच्याही धर्माचा अपमान करण्याचा अधिकार नाही. आम्ही याविरोधात तक्रार दाखल केली असून आंदोलनही करणार असल्याचे गुप्ता म्हणाले.

कपिल मिश्रा यांची टीका

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून दिल्लीतील आप सरकारवर टीका केली. केजरीवाल यांचे मंत्री दिल्लीत हिंदू आणि हिंदू देव-देवतांना शिवीगाळ करत असून स्वत: केजरीवाल गुजारातमध्ये जय श्रीकृष्ण म्हणत मतं मागताहेत. आम आदमी पार्टी गरीब हिंदूंना मोफत राशन देऊन धर्म परिवर्तन करणारी एजन्सी बनलीय, अशी टीका मिश्रा यांनी केली.