
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 प्रकल्पाने वेग घेतला असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मिठीनदीखालील भूमिगत बोगद्याचे काम बुधवारी पूर्ण केले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दोन भूमिगत बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर कृष्णा 3 या टीबीएम मशीनने पॅकेज 4 मधील सिद्धिविनायक मंदिर ते वरळी स्थानक हे 1.28 किमी अंतर खोदून पूर्ण केले. यासाठी 916 सेगमेंट रिंग्जचा वापर करण्यात आला. तर बुधवारी दुपारी गोदावरी 3 या टीबीएम मशीनने मिठी नदीखालील पहिला बोगदा 287 दिवसांत खोदून पूर्ण केला. हे दीड किमी अंतर खोदण्यासाठी 1072 सेगमेंट रिंग्जचा वापर करण्यात आला. काहीच दिवसांत मिठी नदीखालील दुसरा बोगदाही खोदून पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले. मेट्रो 3 च्या 33.5 किमीच्या भूमिगत मार्गातील पूर्ण झालेला हा 27 वा बोगदा आहे. या मार्गात एकूण 32 बोगदे असणार आहेत.
गोदावरी 3 या टीबीएम मशीनने मिठीनदीखालील या बोगद्याचे काम जुलै 2019 मध्ये सुरू केले होते. मिठीनदीखालील बोगद्याचे काम आव्हानात्मक होते. जमीनीवर नदीचा प्रवाह असल्याने भूस्तराचा पोत ओळखून त्याप्रमाणे खोदकाम करणे जिकीरीचे होते. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा आणि दाबाचा विचार करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मिठी नदीखालील या बोगद्याचे काम पूर्ण होणे हा मेट्रो 3 च्या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे या प्रकल्पाचे संचालक एस.के गुप्ता यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसात दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीखाली सुमारे 12.5 मीटर खोलीवर हा बोगद्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मिठी नदीखालील दुसऱ्या बोगद्याचे काम मार्चअखेरीस पूर्ण होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. या मार्गाचे आतापर्यंत 7.97 किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
























































