WC2019 : टीम इंडिया फायनलपासून एक पाऊल दूर, हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये आज सेमीफायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
team-india

सामना प्रतिनिधी, मँचेस्टर

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या वर्ल्ड कपचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. याप्रसंगी रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल हे टीम इंडियाचे अव्वल तीन फलंदाज ट्रेण्ट बोल्ट, मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसन या न्यूझीलंडच्या तेज गोलंदाजांचा कसा सामना करतील यावरच या लढतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकीकडे विराट कोहलीची ब्रिगेड तब्बल आठ वर्षांनंतर फायनलमध्ये पोहचण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ चार वर्षांनंतर पुन्हा एकदा फायनलचे तिकीट बुक करण्यासाठी सर्वस्व पणाला लावील.

मधल्या फळीचा कस
हिंदुस्थानच्या अव्वल तीन फलंदाजांनी या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडलाय. यावेळी रोहित शर्माने पाच शतकांसह 647 धावा, लोकेश राहुलने 360 धावा आणि विराट कोहलीने 442 धावा फटकावल्या असल्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलपर्यंत मजल मारता आली आहे. मात्र या स्पर्धेत आतापर्यंत हिंदुस्थानच्या मधल्या फळीवर मोठी जबाबदारी पडलेली नाहीए. महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांडय़ा, केदार जाधव किंवा दिनेश कार्तिक यांना कठीण परिस्थितीत कसे खेळायला हवे याचा अनुभव आतापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे उद्या ढगाळ वातावरणात बोल्ट ऍण्ड कंपनीसमोर टीम इंडियाचे अव्वल स्टार फलंदाज ढेपाळले तर मधल्या फळीचा कस लागेल हे निश्चित.

एकटय़ा केन विल्यमसनवर अवलंबून राहणे महाग पडेल
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने आतापर्यंत या स्पर्धेत 481 धावा फटकावल्या आहेत. यामध्ये दोन शतके व एका अर्धशतकाचा समावेश आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमध्ये फटकावलेल्या धावसंख्येच्या 29 टक्के धावा केन विल्यम्सनच्या बॅटमधून आल्या आहेत. म्हणजेच किवींचा ‘रनगाडा’ वन मॅन शोच्या खांद्यावर सुरू आहे. उद्याच्या लढतीत त्यांना एकटय़ा कर्णधारावर अवलंबून राहणे महागात पडू शकते. रॉस टेलर, मार्टीन गप्टील, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा.

अकरा वर्षांनंतर…
विराट कोहली व केन विल्यम्सन हे दोन्ही दिग्गज क्रिकेटपटू तब्बल 11 वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या आधी 2008 साली मलेशियात झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या युवा टीम इंडियाने केन विल्यम्सनच्या युवा न्यूझीलंडवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला होता.