‘हा’ आहे जगातील सर्वात आनंदी देश; हिंदुस्थानची 144 व्या स्थानावर घसरण

3791

जगातील आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. फिनलँड सलग तिसऱ्यांदा या यादीत अव्वल स्थानी आला आहे. जगात सर्वात आनंदी व्यक्ती फिनलँडमध्ये असल्याचे यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. तर हिंदुस्थानात आनंदी व्यक्तींची संख्या कमी झाल्याने देशाची मागच्या वेळच्या क्रमवारीत घसरण झाली असून हिंदुस्थान या यादीत 144 व्या क्रमांकावर आहे.

संयुक्त राष्ट्रांनी ‘वर्ल्ड हॅपिनेस नेशन्स’ म्हणजेच आनंदी देशाचा अहवाल जाहीर केला आहे. 156 देशांच्या सर्वेक्षणातून जगातील सर्वात आनंदी देशाची निवड करण्यात आली आहे. त्यात फिनलँड अव्वल ठरला असून हिंदुस्थान 144 व्या स्थानावर आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे या यादीत पाकिस्तानने 66 वे स्थान पटकावले आहे. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्यामुळे ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला आहे. तसेच आर्थिक संकटासह इतर अनेक संकटाशी सामना करणारे पाकिस्तानातील नागरिक आनंदी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लेसोथो आणि मलावी या देशांनाही हिंदुस्थानप्रमाणे 144 वे स्थान देण्यात आले आहे. तर स्वित्झर्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया या देशांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. आनंदी देशांच्या यादीत लक्झेंबर्ग दहाव्या स्थानावर आहे. या यादीत शेवटच्या स्थानावर झिम्बाब्वे, दक्षिण सुदान आणि अफगाणिस्तान हे देश आहेत.

हा अहवाल तयार करण्यासाठी 2018 आणि 2019 मधील माहितीचा आधार घेण्यात आला. जीडीपी, सामाजिक स्तरावरील पाठिंबा, वैयक्तिक स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध विभागांबाबत सर्वेक्षणात नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानुसार अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली आहे. फिनलँडची लोकसंख्या 55 लाख असून सलग तिसऱ्या वर्षी हा जगातील आनंदी देश ठरला आहे. आनंदाचे प्रदर्शन करण्याऐवजी या देशातील नागरिक शांतता आणि एकांताला प्राधान्य देतात. फिनलँडमधील नागरिकांची जीवनशैली उत्कृष्ट असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. सुरक्षा आणि सार्वजनिक सेवांमध्येही हा देश आघाडीवर आहे. या देशात सामाजिक विषमता आणि दारिद्र्य नगण्य आहे. त्यामुळेच फिनलँडने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या