आम्ही शिवचरित्र विकृत करण्यातच गुंतलो – शिवव्याख्याते देशमुख 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

शिवचरित्र व त्यातील युद्धनीतीचा अभ्यास करून व्हिएतनाम सारख्या देशाने बलाढ्य अमेरिकेला वीस वर्ष लढाईत झुंजवून पराभूत केले. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर  आम्ही सर्व जगावर राज्य केले असते. हे व्हिएतनामचा  राष्ट्राध्यक्ष ओचीबिन्ना अभिमानाने सांगतो. तर आपल्या  स्मारकाच्या पायथ्याशी लिहा, ” शिवाजी महाराजांचा निष्ठावंत  सैनिक या ठिकाणी विश्रांती घेत आहे”.  असे मृत्यू पत्रात लिहितो,  याचाच अर्थ शिवाजी महाराज जगाला कळले,  पण दुर्दैवाने  आमच्याकडे आज देखील अनेक जण सुपाऱ्या घेऊन  शिवाजी महाराजांचे चरित्र  विकृत  करण्याचे  काम करीत  असल्याचा घणाघाती आरोप  शिवव्याख्याते  देशमुख यांनी  कोपरगाव येथील  शिवजयंती  उत्सवाच्या  कार्यक्रमात केला.

अध्यक्षपदी ऍड जयंत जोशी होते.  देशमुख म्हणाले मोबाईल, टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ अशी कुठलीही साधने नसताना 1672 साली लंडन गॅझेट त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करण्यात आला होता, असे असताना आपल्या देशात मात्र दुर्दैवाने शिवचरित्राबद्दल विकृत घटना सांगितल्या जातात असे सांगताना ते म्हणाले शिवराज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध होता, परंतु त्या सोहळ्यास रायगडावर 50 हजार ब्राह्मण उपस्थित होते, ही वस्तुस्थिती आहे. गागाभट्ट हे मूळचे पैठणचे कावळे घराण्यातील ते काशीला गेले तेथे त्यांनी धर्मपीठ उभारले   व धर्म ग्रंथ लिहिले होते. ते दक्षिणेच्या लालसेने राज्यभिषेकास आले नव्हते. त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा परिचय  राज्याभिषेकाच्या दहा वर्ष अगोदर होता. महाराजांच्या सैन्यात 30% मुसलमान सैनिक असल्याचा उल्लेख खोटा आहे. तर केवळ  12  मुस्लिम सैनिक  होते.  तेही 1657 पर्यंतच  होते, असेही त्यांनी सांगितले.  सिद्दी हिलाल  हा शहाजीराजांचा गुलाम होता,  मात्र तोही शिवाजी महाराजांची एकनिष्ठ राहिला. समर्थ रामदास  हे औरंगजेबाचे हेर होते,  हेही साफ चुकीचे आहे  ते केवळ  प्रभू रामचंद्र  शिवरायांचे भक्त होते  त्यांनी शिवरायांवर ‘या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे,; ही  लिहिलेली कवणे  शिवराज्याभिषेक झाल्यानंतर समर्थ रामदास यांनी आनंदाने नाचत ‘बुडाला औरंग्या पापी उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया”  असे म्हटले होते. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी  आपल्या आयुष्याची 72 वर्ष  शिवचरित्राचा अभ्यास करण्यात घालवली  व शिवछत्रपती घराघरात पोचविले  त्यांचा इतिहास चुकीचा लिहिला गेला  दुर्दैवाने असा उल्लेख  होतो.  त्याला काही राजकीय पक्ष पाठिंबा देतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असल्याचे सांगून शिवचरित्राच्या विकृती करण्याचा चांगलाच समाचार घेतला.

दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर आल्या पाहिजेत. आणि म्हणूनच शिवचरित्राचे वेगळ्या पद्धतीने अवलोकन केले पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक लढले यांचे चरित्र चांगल्या पद्धतीने वाचन केले पाहिजे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रमोद लबडे, कैलास जाधव, नितीन औताडे, शिवाजी ठाकरे, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.