
हिंदुस्थानचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या इशान किशनचे भाग्य फळफळले आहे. कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या इशानला केएल राहुलच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या 15 सदस्यीय संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आल्याचे आज बीसीसीआयने जाहीर केले. मात्र जयदेव उनाडकटच्या दुखापतीबाबत अद्याप अंतिम माहिती समोर न आल्यामुळे तो संघात कायम आहे. त्याच्याबाबतचा अंतिम निर्णयही बीसीसीआय लवकर घेणार आहे.
ऋषभ पंतला झालेली गंभीर दुखापत त्यामुळे अपयशी कामगिरी असूनही संघात अनुभवी म्हणून केएल राहुलची वर्णी लागली होती. तसेच वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याचा अभाव असल्यामुळे सारखे आतबाहेर होत असलेल्या इशानला त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या बळावर बीसीसीआयने डब्ल्यूटीसीसाठी संघात निवडण्याचे धाडस दाखवले आहे. वर्तमान परिस्थितीत पंत आणि राहुलनंतर फलंदाजी आणि यष्टिरक्षण अशी दुहेरी भूमिका निभावणारा इशान किशन हाच एकमेव पर्याय हिंदुस्थानकडे असल्यामुळे बीसीसीआयने थेट कसोटीच्या वर्ल्ड कपसाठी एकही कसोटी न खेळलेल्या इशानची संघात निवड केली आहे. तो श्रीकर भरतनंतर दुसरा स्पेशालिस्ट यष्टिरक्षक असेल.
भरत की किशन?
आधी भरत की राहुल असा प्रश्न होता. त्यात राहुल भरतपेक्षा काकणभर सरस होता. तसेच राहुलकडे अनुभवही असल्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंत त्याचीच वर्णी लागण्याची शक्यता होती, पण राहुलही अनफिट झाल्यानंतर हिंदुस्थानी संघात धडकी भरली होती. त्यामुळे आता इशानला संधी देऊन बीसीसीआयने आपल्यासमोर आणखी एक पर्याय ठेवला आहे. भरत चार कसोटी खेळला असला तरी संघ व्यवस्थापनाचा कल इशानला ओव्हलवर कसोटी पदार्पणाची संधी देण्याकडे अधिक असेल, असे भाकित क्रिकेट दिग्गज आतापासूनच वर्तवत आहे. भरतला संधी देण्यापेक्षा अनुभवी इशानला निवडण्याचा जुगार संघाने खेळावा, असाही सल्ला दिग्गज देऊ लागले आहेत. इशान आतापर्यंत 48 प्रथम श्रेणी सामने खेळला असून त्याने 40 च्या सरासरीने 2985 धावा केल्या आहेत.
डब्ल्यूटीसीसाठी हिंदुस्थानचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टि.), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टि.).


























































