
कोस्टल रोडसाठी लागणारी खडी घेऊन जाणाऱया डंपरने मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रफुल संजय भोसले असे मृताचे नाव आहे. अपघातप्रकरणी डंपरचालक रिझवान अन्सारीला वरळी पोलिसांनी अटक केली.
प्रफुल हा वरळीच्या गौतमीमाता नगर येथे राहत होता. मंगळवारी रात्री प्रफुल हा मोटारसायकलने वरळी दूध डेअरी परिसरात जात होता. तेव्हा रिझवानचा खडी भरलेला ट्रक अब्दुल गफार खान रोड येथे आला होता. डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक खडी भरली होती. तेथे यू टर्नला परवानगी नसतानाही रिझवान हा टर्न मारत होता. डंपरची धडक लागल्याने प्रफुल जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच वरळी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी प्रफुलला नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरने प्रफुलला मृत घोषित केले. अपघातानंतर रिझवान हा पळून गेला होता. प्रफुलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी डंपरचालक रिझवानविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याला वरळी पोलिसांनी अटक केली. अटक करून आज रिझवानला न्यायालयात हजर केले होते.




























































