प्रभादेवीतील 66 इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून होणारी गळती शोधून केली दुरुस्ती

वरळी, प्रभादेवीसह विविध भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या 66 इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जमिनीखाली अर्थात भूमिगत असलेली जुनी गळती महत्प्रयासाने शोधून, त्याची दुरुस्ती केल्याबद्दल संबंधित पथकासह जल अभियंता विभाग यांचे राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

वरळी, किस्मत सिनेमागृह, साईसुंदर नगर, बेंगॉल केमिकल, सेंच्युरी बाजार, आप्पासाहेब मराठे मार्ग, सिद्धीविनायक मंदिर परिसर आदी परिसरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या 66 इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्ग व मुरारी घाग मार्ग जंक्शन येथे गत काही दिवसांपासून गळती लागल्याचे निदर्शनास आले होते. विशेष म्हणजे वीर सावरकर मार्ग हा सिमेंट काँक्रिटचा रस्ता असल्यामुळे या जलवाहिनीतून होणा-या गळतीबाबत कल्पना येत नव्हती. मात्र मागील काही दिवसांपासून या गळतीमुळे दरदिवशी हजारो लीटर पाणी ड्रेनेजमधून वाहून जात होते. ड्रेनेजमधील ही वाढ हेरुन ‘जी/ दक्षिण’ विभागाने त्याची माहिती त्वरित जल अभियंता विभाग अंतर्गत जलकामे पथकाला दिली.

जलकामे पथकाने सदर ठिकाणी लागलीच तपासणी हाती घेऊन जलवाहिनीतील गळतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. साऊंड रॉड तंत्राच्या माध्यमातून ही तपासणी करीत असताना, जलवाहिनीत गळती असल्याची शंका आल्याने या विभागाच्या अभियंत्यांनी वीर सावरकर मार्गावरील दत्त मंदिरासमोर आणि मुरारी घाग जंक्शनजवळ रस्त्यांवर जलवाहिनीच्या चारही बाजूंनी खोदकाम केले. हा रस्ता एकमार्गी असल्याने तसेच नवरात्रौत्सवामधील मूर्तींचे विसर्जन याच कालावधीत असल्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि योजनाबद्धरितीने कामाची आखणी करण्यात आली. सुरक्षिततेची सर्व काळजी घेवून हा अवघड रस्ता फोडून, गळतीचे पाणी रस्त्यावर येऊन वाया जाणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही, कोणताही अपघात होणार नाही, अशी सर्व दक्षता घेऊन अहोरात्र काम करुन जलवाहिनीतील गळतीचा शोध घेण्यात आला.

नंतर, पाण्याचा दाब कमी असताना रात्रीच्यावेळी जलवाहिनी सर्व बाजूंनी मोकळी करुन तपासणी करण्यात आली. त्यावेळी जलवाहिनीच्या तळाशी 3 ठिकाणी गळती आढळली आणि मोठ्या प्रमाणात पाणी ड्रेनेजमधून वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या गळतीच्या 3 ठिकाणी तातडीने लाकडाच्या खुंट्या मारुन गळतीचा मार्ग तत्काळ बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी एम. एस. टेलपिस वेल्डिंग करुन गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. अशाप्रकारे अनेक दिवसांपासूनच्या जुन्या गळतीचा जलकामे विभागाने अहोरात्र काम करुन शोध घेतला व तातडीने तसेच योग्य दुरुस्ती करुन लाखो लीटर पाणी वाचविले. याचा परिणाम म्हणून संबंधित परिसरांमध्ये उच्च दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, जल अभियंता जय राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली जलकामे विभागाचे सहायक अभियंता जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम अभियंता अमित हटवार, कनिष्ठ अभियंता वैभव गावडे यांच्यासह ‘जी/ दक्षिण’ विभागातील अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने हे विशेष काम यशस्वीपणे मार्गी लागले. नवरात्रौत्सवातील देवी विसर्जन तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा न येऊ देता ही कार्यवाही यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संबंधित परिसरातील नागरिकांनी देखील महानगरपालिकेचे व जलविभागाचे कौतुक केले आहे.

सर्वसाधारणपणे, अशा प्रकारच्या भूमिगत गळती वेळीच निदर्शनास आल्या नाहीत, तर त्या गळती वाढून रस्त्यांचे, आजूबाजूच्या परिसराचे नुकसान होण्याची शक्यता असते. प्रसंगी, अपघातदेखील घडू शकतो. हे धोके लक्षात घेता या कामगिरीचे महत्व लक्षात येते. त्यामुळे संबंधित पथकाचे व अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या