‘खटय़ाळ वस्ती’तले आम्ही कलाकार…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा’ झालेल्या नाटय़कृतीच्या आठवणी जागवत आहे लेखक, दिग्दर्शक व अभिनेता निनाद शेटये…

माझी गणपती बाप्पावर नितांत श्रद्धा आहे आणि माझ्या पहिल्यावहिल्या व्यावसायिक नाटकाचा ‘श्रीगणेशा’सुद्धा गणेशोत्सवात झाला. गिरगावच्या चाळ संस्कृतीत मी मोठा झालो. त्यामुळे सर्व परंपरागत सणसोहळे पाहिले, अनुभवले. शाळेचे गॅदरिंग, ज्ञाती समाजाचा गणपती उत्सव, कॉलेजचे वार्षिक सोहळे, एकांकिका स्पर्धा, गावचा रामनवमी उत्सव व त्यानंतर होणारे नाटक असे सर्व अनुभवत असताना माझ्यात नाटय़कलेची आवड रुजली आणि माझा कलेचा प्रवास सुरू झाला.

आमच्या ज्ञाती समाजातल्या गणेशोत्सवात एकदा लघू नाटय़ करण्याचे ठरले. त्यासाठी ‘चाळकरी व गणेश उत्सव’ असा विषय घेतला. एक-दीड पानांत लिहिलेला तो नाटय़ प्रवेश सर्वांची वाहवा मिळवून गेला. मग पुढे या नाटकाची एकांकिका करावी असे मनात आले. गणेशाच्या कृपेने तशी एकांकिका माझ्या हातून लिहिली गेली आणि ती म्हणजे ‘चाळ नावाची खटय़ाळ वस्ती!’

लालबागचा राजाच्या प्रांगणात एका स्पर्धेत आमचा प्रयोग सादर होत असताना त्यातला आरतीचा प्रसंग सुरू झाला आणि अवघा प्रेक्षक वर्ग उभा राहून आरती करू लागला. हा प्रसंग मला आजही आठवतो. एकांकिका स्पर्धेत ‘चाळ नावाची खटय़ाळ वस्ती’ला कधीच पारितोषिक मिळाले नाही. कारण यातला सहज फुललेला विनोद एकांकिकेच्या अवधीत कधीच संपला नाही. इथेच ‘‘ही एकांकिका नाही, तर हे दोन अंकी नाटक आहे’’ अशी चर्चा झाली. मग याचे ‘चाळ नावाची खटय़ाळ वस्ती’ असे नाटक झाले आणि या नाटकाने मी व्यावसायिक लेखक झालो. नाटकाचा नायकच गणपती बाप्पा होता आणि बाप्पाची दिमाखदार ‘एंट्री’ पाहून रसिक भारावून जायचे. या नाटकानेच मला व्यावसायिक यश मिळवून दिले. हे नाटक पाहून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी ‘‘हे नाटक मला का नाही सुचले!’’ असे म्हणत माझी पाठ थोपटली आणि ही आठवण हृदयात जपून ठेवावी अशी आहे.

नाटकातल्या आरतीला म्हणून आलेले प्रमुख पाहुणे महेश कोठारे, विजू खोटे, गंगाराम गवाणकर, अरुण नलावडे, संजय क्षेमकल्याणी आदी अनेक रंगकर्मींची आमच्या नाटकात ‘एंट्री’ झाली. नाटक गाजत असतानाच दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या एका प्रतिनिधीने श्री शिवाजी मंदिर येथे गणपती मंडळासाठी विचारणा केली तेव्हा बुकिंग काऊंटरवरच्या व्यक्तीने आमचे नाटक सुचवले. दिल्लीतला आमचा तो प्रयोग रंगतदार झाला, पण आमच्या नाटकाला हा दिल्लीवारीचा योग ज्या व्यक्तीमुळे घडून आला, ती व्यक्ती कोण ते आजपर्यंत आम्हाला समजलेले नाही. या नाटकाचा प्रयोग होतोय हे जेव्हा ‘एनएसडी’च्या एका प्रतिनिधीला कळले तेव्हा, विद्यार्थ्यांसाठी प्रयोग कराल का, अशी विचारणा झाली.

एकदा पुण्याचा प्रयोग करून आम्ही परत येत असताना आमच्या नाटकाच्या गाडीला अपघात झाला.स्त्राr-पुरुष, लहान मुले, बॅकस्टेज कलावंत वगैरे मिळून आमचा 27 जणांचा चमू होता. या अपघातात काही मंडळींना मुका मार लागला, पण गाडीतल्या लहान मुलांना व स्त्री कलावंतांना साधे खरचटलेसुद्धा नाही. आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे, हे पाहण्यासाठी बॉक्स उघडला तेव्हा मूर्तीचा काही भाग मोडला होता. अपघाताचे सारे विघ्न त्या विघ्नहर्त्याने स्वतःवर घेतले होते.