
>>प्रसाद नायगावकर
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची झालेली नुकसाभरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल पिक विमा कंपनीचा विमा काढला. परंतु नुकसान भरपाई देण्याऐवजी पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला रद्द केला असल्याने संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात धडकलेल्या मोर्चात शेतकऱ्यांचा आक्रोश होता. दुसऱ्यांदा शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येत असल्याने महायुतीचे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न देत असल्याने एकमुखाने शेतकऱ्यांनी जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या फेऱ्यात पिके सापडल्यानंतर शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने विमारुपी नुकसान भरपाई मिळते. त्यासाठी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी आवाहन केले महागाव तालुक्यात 74 हजार 24 शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनानंतर 1 रुपयात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा पीक विमा भरला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु तालुक्यातील काही शेतकऱ्यांना 11 रुपयांपासून ते 150 रुपये अशी तोकडी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात निराश झाले. तर पिक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे 33 हजार शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित ठेवले. जिल्हा प्रशासनाला रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी जुमानत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकला.
मागील आठवड्यातच जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या हजारो शेतकरी हातात पेटती मशाल घेऊन तहसीलवर धडकले होते. त्यावेळी तालुका प्रशासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुंबईतील वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून पुढील आठवड्यात पिक विमा कंपनीचे अधिकारी आंदोलक शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी महागाव तहसील येथे येण्याचे ठरले होते. त्यामुळे हजारो शेतकरी पुन्हा आज तहसील कार्यालयावर पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत चर्चा करण्यासाठी एकवटले. परंतु मुंबई येथील रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा व्यवस्थापक आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेच नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी आंदोलकांसमोर दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तेहतीस हजार शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याची तयारी नरवाडे यांनी दर्शवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित असलेल्या जिल्हा दौऱ्यामध्ये तालुक्यातील 33 हजार शेतकऱ्यांनी सभेवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा प्रशासना समोर एक मोठे आव्हान उभे झाले आहे. यावेळी तहसीलदार राठोड तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण,ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्यासह प्रचंड पोलीस बंदोबस्त होता यावेळी जगदीश नरवाडे तात्या शिंदे पंजाब पवार अविनाश भांगे समाधान ठाकरे अमोल चंदापूरे दत्ता पाटे सह हजारो शेतकरी उपस्थित होते.या नंतर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
























































