
सामना ऑनलाईन | लंडन
प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत लाटव्हियाची माजी फ्रेंच ओपन विजेती येलेना ओस्तापेन्कोने बेलारूसच्या ऍलिसन्द्रा सासनोविचला ७-६ ( ७/४ ) ,६-० असे पराभूत केले आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. १२व्या मानांकित येलेनाला सोमवारी ५०व्या मानांकित सासनोविचने पहिल्या सेटमध्ये चांगलेच झुंजवले. हा सेट टायब्रेकरने ७-६ असा जिंकल्यावर येलेनाने दुसरा सेट ६-० असा सहज गुंडाळत हि लढत जिंकून आपली विजयी दौड कायम राखली. आता पुढच्या फेरीत तिला स्लोवाकियाच्या जागतिक ३३व्या मानांकित डॉमिनिका सिबूलकोवाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
२१ वर्षीय ओस्तापेन्कोने याआधी २०१७ ला विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याआधी आठवड्यापूर्वी तिने फ़्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. दोन वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या पेट्रा क्विटोव्हाला पराभूत करणाऱ्या सासनोविचवर विजय मिळवत येलेनाने सोमवारी आपल्या पहिल्या विम्बल्डन जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
























































