येस बँक संकटाला काँग्रेसच जबाबदार; रविशंकर प्रसाद यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येस बँकेच्या संकटाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. येस बँकेने दिलेल्या कर्जांमुळे बँक अडचणीत आली आहे. ही सर्व कर्ज मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि केंद्रीय अर्थमंत्रीपद पी. चिंदबरम यांच्याकडे असताना देण्यात आली आहेत. त्यामुळे या संकटाला काँग्रेसच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. तसेच बँकेच्या खातेधारकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाटणामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी युपीए सरकारवर आरोप केले.

येस बँकेबाबत सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. येस बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पावले उचलत आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या काळातच यस बँकेने ही कर्जे दिली होती, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. युपीए सरकारच्या काळात फोन बँकिंग पद्धती होती. याला कर्ज द्या, त्याला कर्ज द्या, त्यांच्याकडून कमीशन घ्या असे आदेश युपीएकडून देण्यात येत होते. या कमीशनमुळेच बँक अडचणीत आली आहे. कोणत्याही खातेधारकांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सुमारे 15 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने रविवारी त्यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 11 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दीवाण हाऊसिंग फायन्सान्स आणि कपूर यांच्या कुटुंबियांचे निवटचे संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवरच आरोप केल्याने राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.