आधी यो-यो टेस्ट; मग संघनिवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,नवी दिल्ली

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता यो-यो टेस्ट (तंदुरुस्ती चाचणी) घेतल्यानंतरच संघ निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी संघात निवड झालेला मोहम्मद शमी आणि वन डे संघात निवड झालेला अंबाती रायुडू हे ‘यो-यो’ टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ला अखेर उपरती झाली.

इंग्लंड दौऱ्यासाठी संजू सॅमसनची हिंदुस्थान ‘अ’ संघात निवड झाली होती, मात्र तोही यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. मागील महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान अफगाणिस्तान कसोटीसाठी आणि इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थान व हिंदुस्थान ‘अ’ संघांची घोषणा झाली होती. संघ जाहीर झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर खेळाडूंची टप्याटप्याने यो-यो टेस्ट झाली. या टेस्टमध्ये राष्ट्रीय संघात निवड झालेले काही खेळाडू नापास झाल्याने अनेकांनी ‘बीसीसीआय’ व्यवस्थापनाची खिल्ली उडविली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ प्रशासन समितीची बैठक झाली. या बैठकीला ‘सीओए’ प्रमुख विनोद राय, डायना एडुल्जी, बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी राहुल जोहर व क्रिकेट संचालन महाप्रबंधक सबा करीम उपस्थित होते. ‘टीम इंडिया’त निवड झाल्यानंतर ‘यो-यो’ टेस्टला सामोरे जाण्यास खेळाडू उत्साही नसतात.

इंग्लंडमधील टी-२० मालिकेसाठी बीसीसीआय पदाधिकाऱ्यानी स्वखर्चाने तेथे राहावे, असे सीओएकडून सांगण्यात आले. तसेच रोहित शर्माची यो-यो टेस्ट बुधवारी होण्याची शक्यता आहे.