दिलासादायक बातमी! योगाभ्यासाने रोखता येतो स्तनाचा कर्करोग, टाटा रुग्णालयाचे महत्त्वपूर्ण संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगाभ्यासाने मृत्यूलाही दूर ठेवता येऊ शकते, हे आता आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. परळ येथील टाटा रुग्णालयाने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू योग केल्याने टाळता येऊ शकतात.

टाटा रुग्णालयाच्या डॉ. नीता नायर यांनी यावर यशस्वीरीत्या संशोधन केले. स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांची त्यादृष्टीने चाचणी केली गेली. त्याचा अहवाल डॉ. नायर यांनी अमेरिकेच्या  सॅन अँटोनियो ब्रेस्ट कॅन्सर परिषदेमध्ये सादर केला.

कर्करुग्णांवर चाचणी करताना तज्ञ योग प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट आणि कर्करोग तज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. नियमित योग केल्याने कर्करोगाचे दुष्परिणाम आणि भीती टाळता येऊ शकते, असे अभ्यासात दिसून आले. स्तनाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती तसेच मृत्यू 15 टक्क्यांनी कमी झाल्याचेही आढळले.