
सामना प्रतिनिधी । वसमत
शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळ रहात असलेला गणेश सुरेशराव जाधव हा तरूण १८ जुलै रोजी खदानीत बुडाला होता. दरम्यान, आज सकाळी ८ वाजता या तरुणाचा मृतदेह १६ तासानंतर सापडला.
वसमत न्यायालय परिसरात बाँड विक्री करणारे सुरेश जाधव यांचा मुलगा गणेश सुरेशराव जाधव हा व त्यांचे काही मित्र शेतात गेले होते. शेतातुन परत येताना १८ जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान दगडगाव रोडवरील खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरले. खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना गणेश जाधव तळाला गेला. सर्वजण पोहुन वर आले, पण गणेश जाधव वर आला नसल्याने त्याचा शोध घेतला. पण तो सापडला नाही.
ही घटना समजल्यावर त्याच्या नातेवाईकांनी घटना स्थळ गाठले. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचारी बडे, भुरके आदीनी जाधवचे नातेवाईक व मित्र प्रभाकर क्षीरसागर, राजु क्षीरसागर, बापु चव्हाणसह पोहणा-यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला, पाण्यात गळ टाकले पण गणेश सापडला नाही. यानंतर बंदखडके यांनी नांदेड येथील जीवरक्षक टिमशी संपर्क करून त्याना पाचरण केले.
गुरूवारी सकाळी नांदेड येथील गोदावरी जीवरक्षक संस्थेची टिम पाणबुडी, जीवरक्षक घेऊन सकाळी ६ वा दगडगाव रोडवरील खदानीजवळ पोंहचली. पाण्यात जाळे टाकून शोध घेतला असता सकाळी ८ वाजता गणेश जाधव याचा मृतदेह आढळून आला.































































