YouTube कडून कोल्हापूरच्या कृष्णराजला सिल्व्हर प्ले बटण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैयक्तिक स्तरावरील व्हिडीओ ब्लॉगचे एक लाख सबस्क्रायबर झाल्याने यूटय़ुबच्या अमेरिकेतील मुख्यालयाकडून कृष्णराज महाडिक यांना सिल्व्हर प्ले बटण अवॉर्ड प्राप्त झाले आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला कार रेसर म्हणून कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. आता अवॉर्डसह व्हिडीओ ब्लॉगरचा मानही त्यांनी पटकावला आहे.

जगभर यूटय़ुबच्या माध्यमातून ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना उपलब्ध आहे. यूटय़ुबवर हजारो, लाखो प्रकारचे व्हिडीओ आहेत. कृष्णराज यांनीही दोन वर्षांपूर्वी स्वतःचे व्हिडीओ ब्लॉग बनवायला सुरुवात केली. यामध्ये कौटुंबिक मौजमजेसह सामाजिक बांधिलकी दाखवून देणाऱया त्यांच्या यूटय़ुब चॅनेलला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली.

हलके फुलके प्रसंग, नर्मविनोदी शैली, अस्सल कोल्हापुरी भाषा, प्रभावी छायाचित्रण, संकलन आणि उत्तम पार्श्वसंगीत यामुळे कृष्णराज यांचे आजवरचे सर्व व्हिडीओ गाजलेआहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे. सध्या दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पाही त्यांनी पूर्ण केला आहे.

प्रत्येक व्हिडीओला सरासरी चार ते साडेचार लाख व्हय़ुज आहेत. वडील धनंजय महाडिक, आई अरुंधती, बंधू पृथ्वीराज आणि विश्वराज यांचे त्याला पाठबळ असून, यापुढे दहा लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे.