बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना अकोल्यात आणखी एक घटना समोर आली आहे. एका नराधम शिक्षकाने सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. धक्कादायक म्हणजे हा शिक्षक या मुलींना आधी अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
बदलापूरात दोन लहान मुलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे बदलापुरात नागरिकांनी स्टेशनवर उतरून आपला रोष व्यक्त केला होता. ही घटना ताजी असताना अकोल्यात आणखी एक अशी घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या काजीखेडमध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रमोद सरकार हा शिक्षक म्हणून काम करत होता. पण गेली सहा महिने तो लहान मुलींचा विनयभंग करत होता. प्रमोदने आठवीत शिकणाऱ्या सहा मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यांच्याशी अश्लील संभाषण करून त्यांचा विनयभंग केला. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. एका पीडित मुलीने आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रमोदने फक्त एकाच नव्हे तर आणखी पाच मुलींचा अशाच प्रकारे विनयभंग केला होता. या प्रकरणी पालकांनी पोलिसांत धाव घेतली आणि प्रमोद सरकारविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दरम्यान लहान मुलींवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याने स्थानिक भागात संताप व्यक्त होत आहे.