पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कल्याण मटका जूगार अडड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. येथून सात जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून शहरातील अवैध धंदे, वैश्या व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू आहे. यानूसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना ताडीवाला रोड परिसरात जूगार अड्डा सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी 8 जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासानिमित्ताने पुणे स्टेशन परिसरात दररोज लाखो प्रवाशांची ये – जा असते. याठिकाणी प्रवासानिमित्ताने आलेल्या अनेक आरोपींची अडवणूक करीत त्यांची लुटमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या घटना घडतात. रात्री उशीरापर्यंत अवैधरित्या हॉटेल, रस्त्यावरील गाडे सुरू राहत असल्याने येथे नागरिकांची गर्दी होते. यातून गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी गेल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत.


























































