नर्सरी ते दुसरीच्या वर्गात मातृभाषेवर भर, राज्य शैक्षणिक आराखडय़ात बाल्यावस्थेतील शिक्षण सुधारण्यावर भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य अभ्यासक्रम आराखडय़ात नर्सरी आणि पहिली, दुसरीच्या शाळांसाठी नमुना वेळापत्रक देण्यात आले असून यात मातृभाषेवर भर देण्यात आला आहे. नर्सरीच्या शाळा साडेतीन तास (210 मिनिटे), तर पहिली व दुसरीची शाळा पाच तासांची (300 मिनिटे) असणार आहे. शाळेच्या एकूण तासांपैकी सुमारे दीड तास हा प्रथम भाषा किंवा मातृभाषेवरील अभ्यासासाठी असणार आहे.

राज्य आराखडय़ामध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) शाळांसाठी नमुना वेळापत्रक देण्यात आले असून स्थानिक संदर्भानुसार त्यामध्ये आवश्यक बदल करून वेळेचे नियोजन करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. वेळापत्रकामध्ये एक संरचित दिनक्रम दिलेला असला तरी त्यात स्थानिक संदर्भ व बालकांच्या गरजांनुसार लवचिकता असावी. एखाद्या बालकाला वेळापत्रकानुसार दिलेली कृती करण्याची अजिबातच इच्छा नसल्यास त्याला हवे असणारे काम शांतपणे करण्याची मुभा द्यावी, असेही म्हटले आहे.

असे असेल वेळापत्रक

 प्रथम भाषा किंवा मातृभाषेसाठी दररोज 90 मिनिटे.
 द्वितीय भाषेसाठी 60 मिनिटे वेळ.
 गणित व संख्या ज्ञान यांसाठी दररोज 60 मिनिटे.
 वेळापत्रकातील अधिक वेळ हा कला, क्रीडा आणि बागकाम यांसारख्या कृतींसाठी देता येईल.
स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार वेळापत्रकात लवचिकता राहील, असेही आराखडय़ामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारपर्यंत हरकती व सूचना पाठविता येणार

राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने (एससीईआरटी) जारी केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडय़ावर (पायाभूत स्तर) हरकती व सूचना पाठविण्यासाठी शुक्रवार, 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ञ, शैक्षणिक प्रशासक यांनी आपला अभिप्राय scffsresponcesmaa.ac.in या ई-मेलवर आयडीवर पाठवायचा आहे.

साक्षरता संख्या ज्ञान आणि कला विषयासाठी स्वतंत्र तासिका

नर्सरीच्या एकूण 210 मिनिटांमध्ये प्रामुख्याने मुक्त खेळ, बोधात्मक विकास, गाणी, भाषा विकास, शारीरिक विकास, परिसर परिचय, सर्जनशील कृती, गोष्टी यांवर अधिक भर देणे अपेक्षित आहे. 3 ते 6 वयोगट एकत्र असताना सर्व भाषांचा वापर संमिश्र पद्धतीने केला जाऊ शकतो, तर वय वर्षे 6 ते 8 म्हणजे पहिली व दुसरीसाठी भाषेसाठी स्वतंत्र वेळ असणे आवश्यक आहे. साक्षरता संख्या ज्ञान आणि कला या विषयांसाठी स्वतंत्र तासिकांचे नियोजनही केले जाऊ शकते, असे आराखडय़ात म्हटले आहे.