मुंबईत 33 हजार बालक, गरोदर मातांचे लसीकरण; पालिकेकडून गोवर रुबेलासाठी विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतून गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेत आतापर्यंत 33 हजार 775 बालक आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत राबवण्यात आली, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईतून डिसेंबर 2023 पर्यंत गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0’ मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका आयुक्त-प्रशासक इकबालसिंह चहल यांच्या निर्देशनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती दल व मुंबईतील सात अतिजोखीमग्रस्त विभागांची बैठक पार पडली होती. तसेच 24 प्रशासकीय विभाग स्तरावर विभाग कृती दलाची बैठक पार पडली. गोवर रुबेलावर मात करण्यासाठी बालक व गरोदर मातांचे लसीकरण करण्यावर भर दिला असून पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱयांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत 5 वयोगटापर्यंत 2 हजार 638 मुलांचे व 304 गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. पैकी 2 हजार 806 बालकांचे व 296 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविकांचा तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता.

असे झाले लसीकरण!

पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट
पहिल्या फेरीत 3,102 बालक व गरोदर मातांचे लसीकरण, यात 2,806 बालके तर 296 गरोदर मातांचे लसीकरण.

दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर
दुसऱया फेरीत 15,522 बालक व गरोदर मातांचे लसीकरण, यात 0 ते 5 वयोगटातील 14,241 बालक तर 1,281 गरोदर मातांचे लसीकरण 1,601 कॅम्पमध्ये झाले.

तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर
तिसऱया फेरीत 15,151 बालक व गरोदर मातांचे, यात 13,903 बालक तर 1,248 गरोदर मातांचे लसीकरण 1,583 कॅम्पमध्ये झाले.