तंजावर येथे 100व्या नाटय़ संमेलनाचा प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

100 व्या ऐतिहासिक मराठी नाटय़ संमेलनाला आज तंजावर येथून प्रारंभ झाला. मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या वाङ्मयाला वंदन आणि नटराज पूजन करण्यात आले.

तंजावर येथील सरस्वती महालात हा कार्यक्रम झाला. यावेळी 99 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले, शाहराज राजे भोसले यांचे ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे पहिले मराठी नाटक होय. शाहराजांनी 22 मराठी, 20 तेलुगू, 1 संस्कृत, 1 तमिळ व 3 हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमीबरोबरच तमिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते.

शिवाजी राजे भोसले म्हणाले, ‘मी व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार आहे याचा मला मोठा अभिमान आहे. राजांच्यामुळेच मला सन्मान मिळत आला. 100 व्या नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे पदाधिकारी इथे तंजावरला आले याचा आनंद वाटत आहे.

यावेळी नाटय़ परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, नियामक मंडळ सदस्य आनंद कुलकर्णी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तुरुवेल्लुवन, जिल्हाधिकारी दीपक जेकब उपस्थित होते. शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ नाटकातील एक प्रवेश प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी सादर केला.