
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱया दहावी-बारावीच्या आऊट ऑफ टर्न पद्धतीने घेतल्या जाणाऱया प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा यापुढे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातूनच आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी या परीक्षा परीक्षा केंद्रावर घेण्यात येत होत्या. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि इतर परीक्षांच्या मूल्यमापनाचे गुण शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगीनमधून भरण्याची सुविधा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता लेखी परीक्षेनंतर आऊट ऑफ टर्न पद्धतीने घेण्यात येणाऱया प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी विषयांच्या परीक्षा या परीक्षा केंद्रावर न घेता विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच आयोजित करण्यात येणार आहे. या बदलाची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सर्व विभागीय सचिवांना दिल्या आहेत.




























































