११ पाईप अन ११ आत्महत्या, दिल्ली सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढलं

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीमधील एका व्यापाऱ्याच्या घरात ११ जणांचे मृतदेह सापडल्याने राजधानी हादरली आहे. यामधील नऊ मृतदेहांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधून ते घरात ग्रिलिंगच्या सिलिंगला लटकून दिले होते. देशभरामध्ये गाजत असलेल्या या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांकडून कसून तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपासामध्ये पोलिसांच्या हाती एक डायरी लागली असून ललित भाटिया यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय धार्मिक होते. तसेच कर्मकांड, अंधश्रद्धा यावरही त्यांचा विश्वास होता असे समोर आले आहे.

दिल्ली सामूहिक आत्महत्या प्रकरणात अंधश्रद्धेची पानं, मोक्षप्राप्तीसाठी दिला जीव

भाटिया यांच्या कुटुंबाने मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी डायरीमध्ये नमूद केलेल्या मजकुरावरून वर्तवला आहे. तपासामध्ये पोलिसांना भाटिया यांच्या घराणध्ये अकरा विशिष्ट पाईप आढळून आले आहेत. हे सर्व पाईप घराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूने लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील सात पाईप सरळ आणि चार पाईप वाकड्या स्थितीमध्ये लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. सामूहिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. अकरा पाईप आणि अकरा आत्महत्या यामुळे प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. या पाईपमधून पाणी बाहेर पडल्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे हे पाईप कशासाठी लावण्यात आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. यामागेही काही अंधश्रद्ध असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे दिसून येत आहे.

अंधश्रद्धा नाही, ही तर हत्या
देशभरात गाजत असलेल्या बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भाटिका कुटुंबातील काही जणांना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मृत ललित आणि भूपी यांची बहीण सुजाता हिने भाटिया कुटुंबाला कोणताही त्रास नव्हता आणि हे खूनाचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबामध्ये काही दिवसांमध्ये लग्न असल्याने सर्व जण उत्साहात होते अशीही माहिती सुजाता यांनी दिली असून पोलीस हे प्रकरण दडपण्याचा अंधश्रद्धेचा आव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाटिया कुटुंबीय हे मूळचे राजस्थानचे असून त्यांचे येथे बुराडीतील संतनगरात तीन मजली इमारतीत तळमजल्यावर किराणा माल आणि प्लायवुडची दुकाने आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. रोज सकाळी सहाला त्यांचे किराणा मालाचे दुकान उघडते. परंतु हे दुकान ७.३० वाजले तरी उघडले नाही तेव्हा एकाने घरात डोकावून पाहिले तर त्याला घरात एका ग्रिलिंगला मृतदेह टांगलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. हे वृत्त सकाळी ऐकून राजधानी दिल्ली हादरली.

आपली प्रतिक्रिया द्या